नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये पोलिसांच्या टीमवर हल्ला केल्याच्या आरोपावरून एका काँग्रेस आमदाराच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कर्नाटकमधील काँग्रेस आमदार नसीर अहमद यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. फैयाज असं नसीर अहमद यांच्या मुलाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कर्तव्यावर असणाऱ्या बंगळुरू पोलिसांच्या टीमवर दारुच्या नशेत असलेल्या फैयाजने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी फैयाजसोबत आणखी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांवर केलेल्या हल्ल्यानंतर तो काही वेळ फरार होता. रात्री साडे बाराच्या वाजण्याच्या सुमारास बंगळुरुमधील अमृथल्ली पोलीस स्टेशनजवळ हा सगळा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
बंगळुरु (उत्तर पूर्व) डीसीपी सी के बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपूलाजवळ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार नसीर अहमद यांचा मुलगा फैयाज याने पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला तेव्हा दारुच्या नशेत होता असा आरोप आहे. याशिवाय त्याने पोलिसाच्या टीमवर प्राणघातक हल्ला देखील केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! मासेमारीला जाण्यासाठी विरोध केल्याने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मासे पकडण्यासाठी सोबत जाण्यास पत्नीने नकार दिला म्हणून रागाच्या भरात पतीने तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मासेमारीला जाण्यावरून पती-पत्नीत वाद सुरू झाला. या वादामुळे संतापलेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याच्या या भयंकर प्रकारामुळे परिरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर तातडीने पत्नीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीररित्या भाजल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने मासेमारीसाठी एकत्र जाण्यास नकार दिल्यानं पतीने तिला मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं.