मुंबई: कोरोनाची लस न घेताच त्याचे बनावट प्रमाणपत्र बनवून त्याची विक्री करणाऱ्या दोन भामट्यांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ५ ने कुर्ला येथून अटक केली. जुबेर इश्तियाक शेख (१९) आणि अल्फैज नजमी हसन खान (१९), अशी त्यांची नावे आहेत. ते उत्तर प्रदेशमधील डॉक्टरच्या मदतीने हे प्रमाणपत्र तयार करीत असल्याचे उघड झाले आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ५ चे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जुबेर शेख या नावाचा इसम कुर्ला परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेतलेल्यांना लसीकरणाचे बनावट सर्टिफिकेट देत आहे. यावरून पालिका एल वाॅर्डच्या सहायक वैद्यकीय अधिकारी लुब्ना अन्सारी यांच्यासह सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तो त्याचा मित्र अल्फैज शेख याच्या मदतीने बनावट प्रमाणपत्र तयार करीत असल्याची माहिती मिळाली.
अल्फैजला वडाळा परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ज्यात उत्तर प्रदेशच्या प्रतापगड, जिल्ह्यातील एक खासगी इसम व स्थानिक डाॅक्टरांच्या मदतीने हे प्रमाणपत्र तयार केल्याचे अल्फैजने सांगितले. त्यांनी अद्याप अशाप्रकारे तिघांना प्रमाणपत्र विकल्याचे पोलिसांकडे कबूल केले असून त्यांना पुढील कारवाईसाठी कुर्ला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.