नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात लुधियानाच्या न्यायालयात झालेल्या बॉम्बस्फोटाला मदत करणाऱ्या व मुंबई तसेच दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणाऱ्या जसविंदर सिंग मुल्तानी याला जर्मनीमध्ये अटक करण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या सीख फॉर जस्टीस संघटनेचा (एसएफजे)ताे प्रमुख कार्यकर्ता आहे.
जसविंदर सिंग मुल्तानी याला अटक करण्यात यावी, अशी विनंती भारत सरकारने जर्मन सरकारला केली होती. त्याचे दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचे पुरावेही भारताने जर्मन पोलिसांना दिले होते. पाकिस्तानशी थेट संबंध असलेल्या खलिस्तानी गटांच्या तो सतत संपर्कात संबंध होता, असे पुरावेही जर्मन सरकारला देण्यात आले होते. त्यानंतर तेथील पोलिसांनी एरफर्ट शहरातून त्याला अटक केली. मूळचा होशियारपूरचा रहिवासी असलेल्या जसविंदर सिंगचे एसएफजा संस्थापक गुरूपटवंत सिंग पन्नू याच्याशी नजीकचे संबंध आहेत.
पाकिस्तानच्या मदतीने तो पिस्तुले, हॅडग्रेनेड आदी शस्त्रास्त्रे व स्फोटके भारतात पाठवत असल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या लक्षात आल्याने त्याच्यावर त्यांची नजर होती. लुधियाना न्यायालयातील बॉम्बस्फोटानंतर पंजाबच्या आणखी काही ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा कट त्याने आखला होता. त्याची संपूर्ण माहिती व पुरावे हाती लागताच या यंत्रणांनी सरकारमार्फत जर्मन पोलिसांशी संपर्क साधला होता. पंजाबमधून पाच जणांना शस्त्रांसह अटक केलेल्या काहींना जसविंदरने शस्त्रे पुरविली होती.
शेतकरी नेत्याला मारण्याचा कटभारतीय किसान युनियन (राजेवाल गट) च्या बलबिर सिंग राजेवाल यांची हत्या करण्याचा कटही जसविंदर सिंग मुल्तानी याने रचला होता, त्यासाठी त्याने काहींना देशी बनावटीची शस्त्रे विकत घेण्यासाठी पैसा पाठविला होता, असे सांगण्यात आले.