मुंबई : कर्नाटक येथील म्हैसूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर युसुफ बचकानाच्या फोनवरून कर्नाटकमध्ये व्यावसायिकाची हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. यातील मुख्य हस्तकास सोमवारी मुंबईतून अटक करण्यात आली.राजेंद्र मोहनसिंग रावत उर्फ राजू नेपाळी (३८) असे अटक हस्तकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध मुंबईतही गुन्हे नोंद आहेत.
कर्नाटक येथील रिअल इस्टेट व्यावसायिक इरफान अल्लाबक्ष हंचनाल उर्फ अलियाज उर्फ फुट इरफान (४५) यांची ६ आॅगस्ट रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी कर्नाटक येथील ओल्ड हुबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्नाटक पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आतापर्यंत सात आरोपींना अटक केली होती. तपासादरम्यान म्हैसूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सुलेमान कादरी उर्फ युसुफ बचकाना याने त्याच्या कर्नाटक व मुंबईतील हस्तकांकडून हत्या घडवून आणल्याचे समोर आले.
यातील मुख्य हस्तक मुंबईत असल्याची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष १२नेही तपास सुरू केला. तसेच कर्नाटक पोलिसांचे पथकही तपासासाठी मुंबईत दाखल झाले. बचकानाच्या हस्तकांवर लक्ष ठेवून असताना बोरीवलीत राहणारा राजू नेपाळी गुन्हे शाखेच्या हाती लागला. कारागृहात असलेल्या बचकाना याच्या फोनवरून हत्या घडवून आणल्याचे नेपाळीने पोलिसांना सांगितले. कारागृहातून हत्येचा कट रचण्यात आल्याने संशय व्यक्त होत आहे.मुंबईतही हत्येचा प्रयत्नराजू नेपाळीने २०१३ मध्ये बचकानाच्या सांगण्यावरून, खंडणीसाठी बोरीवलीतील व्यावसायिकावर गोळीबार केला होता. यातून ते थोडक्यात बचावले. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. यात त्याला अटक करण्यात आली होती. तसेच २००९ मध्ये वनराई पोलीस तर २०१९ मध्ये कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातही त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.हत्येसाठी मिळाले २ लाखनेपाळीला हत्येसाठी शूटर पुरविण्यासाठी २ लाख रुपये देण्यात आले होते. गुन्ह्यानंतर १० लाख देण्याबाबत व त्यांच्या कर्नाटक आणि मुंबई येथील वाहतूक, वास्तव्याची व्यवस्था करण्याबाबत सांगितल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.