मुंबई : कोरोनामुळे वडिलांच्या दुखवट्यात समाजातील लोक सहभागी झाले नाही. मात्र हाच राग मनात धरत करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे समाजातील व्यक्तीच्या मृत्यूनंतरच वडिलांच्या आत्म्यास शांती मिळेल या अंधश्रध्देतून दोन भावंडांनी तिघांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती मुलुंंड पोलिसांच्या कारवाईतून समोर आली. यात ७० हजार रूपयांची सुपारी देत यातील एकाचा काटा काढण्यास त्यांना यश आले. मात्र अन्य दोघांच्या हत्येपूर्वीच पथकाने त्यांचा पर्दाफाश करत जेरबंद केले आहे.
मुलुंड पश्चिमेकडील वालजी लड्ढा रोड येथे पदपथावर झोपलेल्या ७० वर्षीय वृद्धाची २ ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक रमेश ढसाळ यांच्या पथकाने तपास सुरु केला. तपासादरम्यान, त्याच परिसरात महिन्याभरापूर्वी दीपक मोरे (३८) आणि विनोद मोरे (३०) यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. मात्र, वडिलांच्या दुखवट्यात त्यांच्या समाजातील काही जण सहभागी झाले नाही म्हणून त्यांच्या मनात राग होता. आणि वडिलांवर करणी केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय त्यांना असल्याची माहिती मिळाली.
पथकाने हाच धागा पकड़ून तपास सुरु केला. ते राजस्थान, अजमेरमध्ये असल्याची माहिती मिळाली. पुढे ते मुंबईत परतल्याचे समजताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत, मोरे बंधूच्या वडिलांच्या दुखवट्यात त्यांच्या समाजातील व्यक्ती सहभागी झाले नाही. कोणीतरी करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे अंधश्रध्देतून वडिलांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून समाजातील कुणाचा तरी मृत्यू होणे गरजेचे असल्याने, त्यांनी तिघांची नावे काढून त्यांच्या हत्येचा कट आखला. यात, २ ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आलेले ७० वर्षीय वृद्ध त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट ठरले. ठरल्याप्रमाणे ७० हजार रूपयांची सुपारी देत त्यांनी संबंधित वृद्धाची हत्या करून राजस्थान, अजमेरला पळ काढला. त्यानुसार मोरे बंधूसह आसिफ नासिर शेख (२८), मोईनुद्दीन अलाउद्दीन अन्सारी उर्फ साहिल (२७), आरिफ अब्दुल सत्तार खान (३०) आणि शाहनवाज उर्फ सोनू अख्तार शेख (३०) यांना अटक करण्यात आली आहे. हत्येपुर्वी १० हजार आणि हत्येनंतर ६० हजार रुपये देण्यात आले होते. मोरे बंधूसह अन्य आरोपी अभिलेखावरील आरोपी आहेत.