कोलकाता - बांग्लादेशातून भारतात आलेले आवामी लीगचे खासदार मोहम्मद अनवारूल अजीम अनवर यांच्या हत्येचा तपास पश्चिम बंगालच्या सीआयडीकडे सोपवला आहे. या घटनेत वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली आहे. फॉरेन्सिक विभागानं कारमधील काही सॅम्पल घेतले आहेत. कारच्या मालकानं ही गाडी भाड्यानं दिली होती. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपींनी हत्येनंतर खासदाराच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले त्यावरून किती निर्दयीपणे ही हत्या झाली याचा अंदाज येतो. अनवारूल अजीम कोलकाता येथे उपचारासाठी आले होते. १३ मे पासून ते गायब होते. त्यांच्या मुलीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही. त्यानंतर खासदाराचे मित्र गोपाळ विश्वास यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर कोलकाता येथे खासदार बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली.
बांग्लादेशचे खासदार अनवारूल यांची १३ मे रोजी न्यू टाउन येथील एका फ्लॅटमध्ये गळा दाबून हत्या करण्यात आली होती. गुन्हेगारांनी खासदाराच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले जेणेकरून ते कुठेतरी फेकले जातील. १४, १५ आणि १८ मे रोजी फ्लॅटमधून मृतदेहाचे तुकडे बाहेर काढले. २ जणांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं काम दिले. हे दोघेही फरार आहेत. पोलीस सध्या मृतदेहाचे फेकलेले तुकडे शोधत आहे.
या प्रकरणी सीआयडीचे अधिकारी अखिलेश चतुर्वेदी यांनी सांगितले की, बांग्लादेशचे खासदार अनवारूल अजीम हे वैयक्तिक कामासाठी भारतात आले होते. त्यानंतर १३ मे पासून ते बेपत्ता होते. त्यांच्या मुलीने त्यांच्याशी संपर्क साधला पण तो झाला नाही. त्यानंतर खासदार बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. २२ तारखेला आम्हाला त्यांची हत्या झाल्याची माहिती मिळाली. आम्ही तातडीने संबंधित फ्लॅटवर धाड टाकली जिथे त्यांना शेवटचं पाहिलं होते. त्याठिकाणी मृतदेहाचे तुकडे सापडले.
बांग्लादेशही करणार तपास
खासदाराच्या हत्येची दखल बांग्लादेशनेही घेतली असून या प्रकरणाचा तपास तिथले पोलिसही करणार आहेत. नियोजनबद्ध खासदाराची हत्या करण्यात आली. या हत्येचा उद्देश आणि गुन्हेगार कोण हे शोधण्यासाठी भारत आणि बांग्लादेश पोलीस एकत्रित काम करतील. त्यासाठी आम्ही आवश्यक आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करू असं बांग्लादेशचे गृहमंत्री असदुज्जमाँ खान यांनी म्हटलं.
ते २ पुरुष अन् महिला कोण?
पीटीआयनुसार, जेव्हा खासदार अनवर यांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत २ पुरुष आणि १ महिला होती. सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता अज्ञात पुरुष आणि महिला १५ मे पासून १७ मेपर्यंत अनेकदा फ्लॅटमधून आतबाहेर करत होते. परंतु खासदार त्यात दिसले नाहीत. खासदारासोबत शेवटचे दिसलेल्या या तिघांनी कमीत कमी दोन वेळा बांग्लादेशहून परतले. तर याच प्रकरणी बांग्लादेश पोलिसांनी ढाका येथे तिघांना अटक केल्याची माहिती पुढे आली आहे.