Indian Railway : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघात घडवण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता ताजी घटना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये घडली आहे. येथे ट्रेन उडवण्याचा कट रचण्यात आला. या कटाचा भाग म्हणून आरोपींनी हरिद्वार-डेहराडून रेल्वे ट्रॅकवर डेटोनेटर पेरले होते. सुदैवाने याची माहिती वेळीच मिळाली आणि सुरक्षा यंत्रणांनी डेटोनेटर जप्त केले. ही घटना हरिद्वारच्या मोतीचूर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणांसह केंद्रीय यंत्रणांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या एजन्सींनी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील रहिवासी असलेल्या तरुणाला रेल्वे ट्रॅकजवळून ताब्यात घेतले आहे. त्यानेच हा डिटोनेटर पेरल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅकवर डेटोनेटर असल्याची माहिती मिळताच घबराट पसरली. घाईगडबडीत स्थानिक पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा धावून आल्या. दरम्यान, एक तरुण रेल्वे ट्रॅकवर संशयास्पद अवस्थेत फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसला.
त्या आधारावर पोलिसांनी तत्काळ युवकाची ओळख पटवून त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. अशोक असे या तरुणाचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील रामपूर येथील रहिवासी आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय यंत्रणांनीही तपास सुरू केला आहे.