ठाणे : नाशिकमधीलडॉक्टरच्या खुनासाठी ३ लाखांची सुपारी देऊन विषारी इंजेक्शन आणि सिरींज देणाऱ्या नेहा जाधव उर्फ जोत्स्ना अमोल पगारे (४७, रा. अशोकनगर, बाळकुमपाडा, ठाणे) या महिलेला अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने २१ जानेवारी रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास केली.
आरोपी महिलेला २४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी रविवारी दिली. ठाण्याच्या बाळकूम भागात राहणारी नेहा ही नाशिकच्या एका डॉक्टरच्या खुनासाठी सुपारी देणार असून, ती मारेकऱ्याच्या शोधात असल्याची टीप खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांना मिळाली. बागडे यांनी बनावट मारेकरी म्हणून एका व्यक्तीला तिच्याकडे पाठविले.
अशी झाली गुन्ह्याची उकल नेहाने डॉ. किरण बेंडाळे यांच्या खुनासाठी तीन लाखांची सुपारी त्याला दिली. डॉ. किरण यांचा फोटो, काम करण्याच्या ठिकाणाची माहिती, विषारी इंजेक्शन, सिरींजही मारेकऱ्याला तिने दिले. हा प्रकार उघड झाल्यानंतर या बनावट मारेकऱ्याने नेहाविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५० लाखांसाठी धमक्याआरोपी महिलेचे डॉ. किरण याच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याचा फायदा घेऊन ती त्यांना ब्लॅकमेल करून ५० लाखांच्या खंडणीची मागणी करीत होती. खंडणी न दिल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी ती वारंवार देत होती, असे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती बागडे यांनी दिली.