औरंगाबाद - मुंब्रा आणि औरंगाबादेतून एटीएसने अटक केलेल्या त्या नऊ आयएस संशयितांनी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रार्थना स्थळांच्या प्रसादात विष कालविण्याचा कट रचला होता. त्यांच्याकडून वेगवेगळी विषारी द्रव्ये, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तसेच ते आयसिसने प्रेरित झाले असून ‘टेलिग्राम सोशल अॅप’द्वारे परकीय हस्तकांशी संपर्कात असावेत, असा संशय एटीएसनेन्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी १४ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.
एटीएसने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून २२ जानेवारीच्या पहाटे ८ जणांना अटक केली होती. या संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना सोमवारी एटीएसचे विशेष न्यायाधीश टी. आर. चौधरी यांच्या समोर हजर केले. यात मजहर अब्दुल रशीद शेख, मो. तकी ऊर्फ अबू खालीद सिराजउद्दीन खान, मो. मुशाहीद उल इस्लाम, मो. सर्फराज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी, जमान नवाब खुटेउपाड, सलमान सिराजउद्दीन, फहाज शेख, मोहसीन सिराजउद्दीन याच्यासह एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. यावेळी एटीएसच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी बाजू मांडली. आरोपींनी विशिष्ट विचारसरणीने प्रेरित होऊन दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता. यासाठी आवश्यक असलेली स्फोटके तयार करण्यासाठी वस्तूंची जमवाजमव केली. हे जप्त केलेल्या वस्तूंमधून स्पष्ट झाले आहे. आरोपींकडून विशिष्ट समुदायाच्या मंदिरातील महाप्रसादात विष कालविण्याचा कटही आखण्यात आला होता. यासाठी वापरण्यात येणारे विषारी औषध तपास संस्थेने जप्त केले. आरोपींकडे सापडलेल्या लॅपटॉप, पेनड्राईव्ह, हार्डडिस्क आदींचा तपास सुरू आहे. या इलेक्ट्रॉनिक साहित्याची तपासणी करण्यात संशयितांकडून सहकार्य मिळत नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसच्या बाबतीतील पुस्तके, व्हिडिओ क्लिपसह इतर साहित्य संशयितांकडे सापडले आहे. हे साहित्य कोणी पुरवले, याचाही तपास बाकी आहे. नऊ जणांशिवाय या कटात इतरांचा सहभाग आहे. अॅपच्या माध्यमातून कोणत्या परदेशी व्यक्ती चॅट करीत होत्या, याची माहिती मिळणे बाकी असल्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याची मागणी देशपांडे यांनी केली. न्यायाधीशांनी आरोपींच्या कोठडीत ९ दिवसांची वाढ केली.