नवी मुंबई: नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरीया व हवालदार इकबाल शेख यास २५ हजार रुपये लाच घेताना अटक केली आहे. गुटखा विक्री करण्यास अभय देण्यासाठी लाच मागितली होती.
नवी मुंबई मधील गुटखा विक्री करण्यास अभय देण्यासाठी छापरीया यांनी हवालदार इकबाल शेख च्या माध्यमातून संबंधितांकडे लाच मागितली होती. शेख याने ४५ हजार लाच मागितली. यामधील ७५०० वरिष्ठांसाठी व ३२५०० स्वतःसाठी मागितले होते. या प्रकरणी संबंधित व्यापा-याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सायंकाळी सव्वापाच वाजता २५ हजार रुपये लाच घेताना ताब्यात घेतले. छापरीया व शेख या दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती, योगेश देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.