उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉन्स्टेबल म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे तब्बल पाच कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. कानपूरमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तो आता पकडला गेला आहे. पकडलेल्या कॉन्स्टेबलने केवळ 11 वर्षांच्या सेवेत तब्बल 5 कोटी रुपयांची संपत्ती कमावली होती. लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने कानपूरच्या कॉन्स्टेबलविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
कानपूरच्या या कॉन्स्टेबलला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पकडण्यात आलं होतं, जेव्हा त्याने कागदपत्रांमध्ये आपलं एकूण उत्पन्न 5 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं, परंतु त्याचा खर्च 8 कोटी रुपये दाखवला होता. या आधारे कानपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासाअंती चकेरी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबलविरुद्ध भ्रष्टाचाराच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तो उन्नावमध्ये तैनात होता.
कॉन्स्टेबलच्या बंगल्याची किंमत 5 कोटींहून अधिक आहे. 2019 मध्ये, रमाकांत पांडे नावाच्या व्यक्तीने चकेरी भागात तैनात कॉन्स्टेबल श्याम सुशील मिश्रा विरोधात तक्रार केली होती की, त्याच्याकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आहे असं सांगितलं होतं. तसेच त्याच्याकडे बंगला आणि कोट्यवधींच्या गाड्या असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. उत्तर प्रदेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास सुरू केला.
4 वर्षे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर अधिकाऱ्यांना आढळून आलं की कॉन्स्टेबलने 11 वर्षांत 5 कोटी 11 लाख रुपये कमाई दाखवली, तर तपासादरम्यान खर्च 8 कोटी 21 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं. अशाप्रकारे त्याच्या कमाईत 3 कोटींहून अधिकची तफावत आढळून आली. तो अनेक चुकीच्या कामात सहभागी असल्याचं देखील समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.