इस्लामाबाद - हेरगिरी आणि विध्वंसक कृत्ये करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवून लष्करी न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कमांडर कुलभूषण जाधव यांची भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांनी उद्या भेट देणार असल्याची माहिती पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
कुलभूषण जाधव यांच्या अटकेची माहिती त्वरित न कळवून व जाधव यांना त्यांच्या देशाच्या वकिलातीच्या अधिकाऱ्यांची भेट न घेऊ देऊन पाकिस्तानने जिनेव्हा कराराचा भंग केल्याचा निकाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या दि हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १७ जुलै रोजी दिला होता. अटकेतील परकीय नागरिकास वकिलातीच्या अधिकाऱ्यांना भेटू देण्यास राजनैतिक भाषेत ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’ असे म्हटले जाते. पाकिस्तानने जाधव यांना ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’ देऊन झालेल्या चुकीचे परिमार्जन करावे व त्यानंतर जाधव यांच्या शिक्षेचा ‘परिणामकारक’ फेरविचार करावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता.