बापू सोळुंके
औरंगाबाद : नाशिक येथील दारू उत्पादक कंपनीतून कंटेनरमधून आणलेले २० लाख रुपये किमतीच्या विदेशी दारूचे ४०० बॉक्स कंटेनरचालकाने विश्वासघात करीत लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात कंटेनरचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
इम्रान शेख असे आरोपी कंटेनरचालकाचे नाव आहे. वाळूज येथील ट्रान्स्पोर्ट कंपनीला दिंडोरी (जि.नाशिक) एमआयडीसीतील युनायटेड स्पिरिट कंपनीतून विदेशी दारूचे ४०० बॉक्स औरंगाबादेतील करोडी येथील रिचमॅन कंपनीच्या गोदामापर्यंत आणण्याचे काम मिळाले होते. ट्रान्स्पोर्ट कंपनीने यासाठी इम्रानला नेमले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घेऊन इम्रानने दिंडोरी येथील कंपनीतून त्याच्या कंटेनरमध्ये विदेशी दारूचे ४०० बॉक्स भरले आणि २० ऑगस्ट रोजी तो कंटेनर घेऊन औरंगाबादला निघाल्यानंतर २२ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत त्याने हा दारूसाठा करोडीतील गोडाऊनमध्ये पोहोचविणे गरजेचे होते. मात्र, तो तेथे पोहोचला नाही. यामुळे ट्रान्स्पोर्टचे व्यवस्थापक मनोजकुमार महावीरसिंग यांना शंका आल्याने त्यांनी इम्रानच्या मोाबाइलवर संपर्क केला. मात्र, त्याचा मोबाइल बंद होता.
यानंतर त्यांनी ट्रक मालकाकडे चौकशी केली. त्यांनाही इम्रानबद्दल माहिती नसल्याचे समजले. ट्रान्स्पोर्ट कंपनीने जीपीएसच्या आधारे माहिती घेतली असता हा कंटेनर जालना रोडवरील सेव्हन हिलजवळ उभा होता, असे समजले. त्यांनी जवाहरनगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी शोध घेतला असता हा कंटेनर सेव्हन हिलजवळ उभा असल्याचे आणि त्यातील दारूसाठा गायब असल्याचे दिसले. कंटेनरचालक इम्रान शेख याने विश्वासघात करून २० लाखांचा विदेशी दारूसाठा लंपास केल्याचे निष्पन्न झाल्याने मनोजकुमार यांनी जवाहरनगर ठाण्यात तक्रार दिली. यावरून गुन्हा नोंदवून पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.