लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड सेंटरमधून एका रुग्णाचे रेमडेसिविर इंजेक्शन चोरून प्रियकराच्या मदतीने त्याचा काळाबाजार करणाऱ्या नर्सला (परिचारिका) वाठोडा पोलिसांनी पकडले. ज्योती अजित आणि शुभम सत्यनिवास अर्जुनवार अशी आरोपींची नावे आहेत.
ज्योती जामठा येथील गायकवाड पाटील परिसरातील कोविड सेंटरमध्ये नर्स आहे. ती मूळची सिवनी येथील रहिवासी आहे. भोपाळ येथून नर्सिंग कोर्स केल्यानंतर ती नागपूरला आली. तिचे शुभमसोबत प्रेमसंबंध आहेत. शुभम बांधकाम ठेकेदार आहे. ज्योती रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करू लागली. तिने शुभमलाही आपल्या योजनेत सामील केले. वाठोडा पोलिसांनी याची माहिती मिळाली. शुभम बाईकवर बसून वाठोडा स्मशानभूमीतून इंजेक्शन विकत होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पाच इंजेक्शन सापडले.
इंजेक्शन्स कुठून आणली, असे विचारले असता शुभम समाधानकारक उत्तर देत नव्हता. पोलिसी खाक्या दाखवताच शुभमने ज्योतीचे नाव सांगितले. सोमवारी सकाळी ज्योतीलाही ताब्यात घेण्यात आले. तिने कोरोना रुग्णाच्या मेडिसिन किटमधून इंजेक्शन चोरल्याचे कबूल केले. दोघांनाही दोन दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले. ‘लोकमत’ने १४ एप्रिलच्या अंकात रेमडेसिविरच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.
तीन दिवसांत ४० रेमडेसिविर जप्त गेल्या तीन दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराचे चार रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहेत. यात १४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून ४० इंजेक्शन जप्त करण्यात आले. यात ९ वॉर्ड बॉय आणि एक नर्सचा समावेश आहे. तसेच एक डॉक्टर, दोन मेडिसिन स्टोअरचे कर्मचारी आणि फार्म डिस्ट्रिब्युटर व कथित पत्रकाराचाही समावेश आहे.