मडगाव : पॉर्न व्हिडीओ प्रकरणात अटक करण्यात आलेली वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना अटक करण्यात आली तरी रात्री उशिरा काणकोण न्यायालयाने प्रत्येकी 20 हजारांच्या जामिनावर मुक्त केले. मात्र असे जरी असले तरी पुढचे 6 दिवस त्यांना काणकोण पोलीस स्थानकावर हजेरी देण्याची अट घालण्यात आली असून न्यायालयाच्या परवानगीशिवायगोवा सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली.
पूनम आणि सॅम मागचा महिनाभर काणकोण येथेच वास्तव्य करून होते. याच दरम्यान त्यांनी हा व्हिडीओ शूट केला होता. या प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर त्या दोघांनी आपले वास्तव्य उत्तर गोव्यात सिकेरी येथे हलविले होते. त्यांनी शुक्रवारी काणकोण पोलीस स्थानकावर चौकशीसाठी यावे अशी नोटीस त्यांना काढण्यात आली होती पण गुरुवारी सायंकाळीच ते मुंबईला जाण्यासाठी निघणार अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांना दुपारीच ताब्यात घेण्यात आले. अटक केल्यानंतर त्यांनी लगेच जामिनासाठी अर्ज दाखल केला. काणकोणचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शानुर अवदी यांनी त्यांना जामीन मंजूर केला.
दरम्यान, काणकोण पोलीस स्थानकावर पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांविरुद्ध अश्लील व्हिडीओ शूट करणे आणि सरकारी मालमत्तेत घुसखोरी करणे या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून त्या दोघांनाही चौकशीसाठी बोलावून घेतले जाईल, अशी माहिती पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी हा सॉफ्ट पॉर्न व्हिडीओ शूट करण्यात आला. त्यावेळी पूनम आणि तिचा पती सॅम हे दोघेच तेथे उपस्थित होते. पुनमचा हा व्हिडीओ सॅमने शूट केला होता. हा व्हिडीओ शूट करताना त्या ठिकाणी दोन साध्या वेषातील पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यांनाही निलंबित करण्यात आले असून, या धरणावर पहाऱ्यासाठी त्या दिवशी उपस्थित असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे.