नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या गोविंद कदम शिरसीकर या युवकाविरुद्ध सोमवारी रात्री रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नरसी येथील माजी उपसरपंच सुधाकर भिलवंडे यांनी रामतीर्थ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, उपचारासाठी ते मुंबईला गेले आहेत. त्याचवेळी गोविंद कदम शिरसीकर या युवकाने आपल्या फेसबुक अकाउंटवर चव्हाण यांच्या प्रकृती स्वास्थ्यासंदर्भात एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली. कोरोनाच्या संकटकाळी विकृत मनोवृत्तीतून टाकलेली ही पोस्ट बघून अनेकांनी तीव्र निषेध केला. त्यानंतर गोविंद कदम याने ती वादग्रस्त पोस्ट डिलीट केली.
याबाबत नरसी येथील माजी उपसरपंच सुधाकर भिलवंडे, नजीर बागवाण, नजीर खाकीसाब शेख व फारुक पटेल या नागरिकांनी तातडीने सविस्तर तक्रार सोमवारी सायंकाळीच रामतीर्थ पोलीसांत दाखल केली. अवमानकारक व समाजात दुरावा निर्माण करणारे कृत्य करून भावना दुखावल्याप्रकरणी सोमवारी रात्री गोविंद कदम शिरसीकर याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.