मुंबई - कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून केली आहे. अखेर कांदिवली पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे पत्र कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंदकुले यांना देण्यात आले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या हे याप्रकरणी अडचणीत येऊ शकतात.
या पत्रात किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या काँग्रेस नेत्यांनी केली. सोमवारी महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना कॅबिनेच मंत्री बनवण्यात आलं. मात्र, १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला विरोध करणारा देशद्रोही मंत्री कसा होऊ शकतो, असा सवाल किरीट सोमय्या यांनी ट्विट करत उपस्थित करून शिवसेनेला धारेवर धरले. २०१५ मधील अधिवेशनात काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली होती.
त्यानंतर भाजप, शिवसेना आमदारांनी विरोध करत सहा वेळा अधिवेशनाचं कामकाज स्थगित केले होते. अस्लम शेख यांना २०१५ साली शिवसेनेने ‘देशद्रोही’ म्हटलं होतं, मात्र तेच आता उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री कसे झाले’ असं सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत विचारले आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘उद्धवा, अजब तुझे सरकार!!!? देशद्रोही आत्ता देशभक्त झाले!!! देशद्रोही अस्लम शेख, आत्ता देशभक्त झाले!!!???’ असं सोमय्यांनी ट्वीट केलं आहे.