जालना ; दलित समाजाचा अपमान केल्याबद्दल भाजपचे परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरोधात तालुका जालना पोलीस शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदार लोणीकर यांनी त्यांच्या औरंगाबादमधील बंगल्यातील थकीत वीज बिलाअभावी विजेचे मीटर इंजिनिअरने काढून नेले म्हणून त्यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. यात त्यांनी झोपडपट्टीवर, दलित वस्तीवर जाऊन त्यांचे आकडे काढा असे म्हटले आहे. यामुळे दलित समाजाचा अपमान झाला असून अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांच्या फिर्यादीवरून आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. शिवीगाळसोबतच आमदार लोणीकर यांनी अभियंत्यास आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकी देखील दिली होती. आकडे टाकणाऱ्यांची वीज तोड असे आव्हान करून आमच्यासोबत नीट राहायचे, एका मिनिटात सस्पेंड करून टाकेल, अशा धमक्या लोणीकर यांनी फोनवरून दिल्याचा आरोप आहे.
औरंगाबाद येथील सातारा परिसरात बबनराव लोणीकर यांचा एक बंगला आहे. येथे जाधव नावाच्या व्यक्तीच्या नावे वीज मीटर आहे. या ठिकाणचे दोन वर्षांपासूनचे ३ लाख रुपयांचे थकीत वीजबिल आहे. वसुलीसाठी लोणीकर यांच्या घराच्या अनेक चकरा मारल्या, मुलासोबत बोलणे झाले,तरीही बिल भरले नाही, असे महावितरणचे सहाय्यक अभियंता फोनवरून लोणीकर यांना सांगतात. मात्र, नोटीस न देता वीज मीटर कसे काय काढून नेले याचा जाब विचारत आमदार लोणीकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ केलेले क्लिपमधून ऐकण्यात येते.