कन्नड : मोबाईलमध्ये लुडो गेम खेळतांना उद्भवलेल्या वादातुन एका पंधरा वर्षीय मुलाचा त्याच्या मित्रांनीच खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील चिंचखेडा शिवारातील गायरान तळ्याजवळ गुरुवारी घडली. कौतीक राठोड असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीसांनी अवघ्या पाच तासात आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल सुबाराम जाधव ( २५ ) व त्याचा लहान भाऊ ( विधि संघर्ष बालक) व कौतीक राठोड ( १५ ) हे तिघेही गुदमातांडा येथील रहिवासी असून त्यांच्यात चांगली मैत्री आहे. गुरुवारी तिघेही चिंचखेडा खुर्द शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. याचा दरम्यान ते मोबाईलवर लुडो गेम खेळत होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कौतीकने राहुलच्या लहान भावास त्याच्या शेळ्या वळवून आणण्यास सांगीतले. मात्र राहुलच्या भावाने त्यास नकार दिल्याने कौतिकने त्याला चापट मारली. भावाला मारल्याचे पाहून राग अनावर झालेल्या राहुलने कौतीकला मारहाण सुरु केली. यात कौतीक बेशुद्ध पडला, मात्र यावर न थांबता दोन्ही भावांनी मिळून दोरीने कौत्तिकचा गळा आवळत खून केला. यानंतर दोघे भाऊ दुचाकीवरून तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी जगदीश सातव, पोनि. सुनिल नेवसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना धुळे येथून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोनि. सुनिल नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. कुठूंबरे करत आहेत.