नागपूर : आरोग्य विभागाच्या कर्मचारी भरती परीक्षेत कॉपी करणे एका उमेदवाराला चांगलेच महागात पडले. त्याच्याविरोधात थेट पोलीस ठाण्यात गुन्हाच दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागात ग्रुप सी व डी च्या १ हजार ९० पदांसाठी ३० नोव्हेंबर, ७ व १२ डिसेंबर रोजी परीक्षेचे नियोजन होते. ३० नोव्हेंबर रोजी आयडी झेड-२, वाडी येथील परीक्षा केंद्रावरदेखील परीक्षा होती. सकाळी ९ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. बल्लारपूर येथून परीक्षा देण्यासाठी आलेल्या समीर हा तरुण कॉपी करताना रंगेहाथ सापडला. त्याच्याजवळील चिठ्ठीमध्ये अभ्यासक्रमातील नोट्स बारीक अक्षरात लिहील्या होत्या. परीक्षा केंद्रावरील ॲडमिन मॅनेजर नितीन भानुसे यांनी या प्रकाराची माहिती निरीक्षक विवेक सक्सेना यांना दिली. त्यांनी तरुणाला विचारणा केली असता त्याने कॉपी करत असल्याचे मान्य केले. त्याच्याविरोधात सक्सेना यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कॉपीबहाद्दराविरोधात गुन्हा नोंदविला आहे.