नागपूर - रुग्णालयातून उपचार झाल्यानंतर घरी पोहोचलेल्या एका कोरोना बाधिताने सामाजिक वातावरण दूषित करू पाहणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोरोना बाधिताविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा व्यापारी असून तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. टोपी विकण्याचा व्यवसाय करणारा कोरोनाबाधित १३ मार्चला दिल्लीला गेला होता. तेथून माल खरेदी करून तो १५ मार्चला नागपुरात आला. त्याची दिल्ली ट्रॅव्हल हिस्ट्री कळाल्यानंतर त्याला एमएलए हॉस्टेल नागपूर येथे अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. ४ तारखेला तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दरम्यान, त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबातील ७ आणि आजूबाजूला राहणाऱ्या, संपर्कात आलेल्या ३९ व्यक्तींनाही क्वारंटाईन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी लाल साहेब चौक, कादर चौक, टिमकी, मोमिनपुरा आणि भगवाघर चौक हा परिसर सील केला.
दरम्यान, उपचार करून त्याला शुक्रवारी रात्री सुट्टी देण्यात आली. कोरोनाबाधित रात्री घरी पोहोचला आणि काही वेळातच त्यांनी उपद्रव सुरू केला. स्वतःचे डिस्चार्ज रिपोर्ट त्याने सोशल मीडियावर अपलोड केले. आपल्याला काहीच झाले नव्हते. जबरदस्तीने आपल्याला क्वारंटाईन करण्यात आल्याचा कांगावा त्याने सुरू केला.
शनिवारी सकाळी हा प्रकार कळाल्यानंतर त्याच्या उपद्रवाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील यांनी तहसील पोलिसांकडे धाव घेत त्या उपद्रवीविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून तहसीलचे ठाणेदार जयेश भंडारकर यांनी त्या उपद्रवीविरुद्ध भादवीच्या कलम १८८,१८६, २७० आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम ३ नुसारशनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि पोलिसांचे पथक पुन्हा जमिरुलच्या घरी धडकले. वृत्त लिहिस्तोवर त्या इसमाला ताब्यात घेऊन क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू होती.यापूर्वीही केला उपद्रवआरोपी इसमाने त्याला क्वारंटाईन करून एमएलए हॉस्टेलच्या अलगीकरण कक्षात ठेवले असता तो तिथेही उपद्रव करीत होता. त्याने मोबाईलवरून अनेकांचे फोटो काढले. शिवाय इकडे तिकडे तो फिरत होता. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून तेथील व्यवस्था चांगली नसल्याच्या तक्रारी करूनही त्याने प्रशासनाला नाहक त्रास देण्याचा उपद्रव केला होता, अशी माहितीपुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.पोलिसांचे प्रशासनाला पत्र कोरोनाबाधित असल्याने त्याच्यामुळे आधीच परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. उपचारानंतर सुट्टी झाल्यावर त्याने स्वतःची, कुटुंबातील सदस्यांची आणि इतरांची पुरेशी काळजी न घेता सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गंभीर असून त्याची एकूणच वृत्ती बघता त्याला पुन्हा क्वॉरेटाईन करण्यात यावे, अशी सूचनावजा मागणी पोलिसांनी प्रशासनाकडे शनिवारी एका पत्रातून केली आहे.