नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,68,063 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 277 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 4,461 वर पोहोचला आहे. याच दरम्यान देशात वेगाने लसीकरण सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. असं असताना आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरांनी चक्क कोरोना लसीवरच डल्ला मारला आहे.
हेल्थ सेंटरचा दरवाजा तोडून तब्बल 600 हून अधिक डोस चोरीला गेल्य़ाची घटना आता समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे. जामबाग UPHC येथून चोरांनी कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनचे 600 हून अधिक डोस लंपास केले आहेत. एवढंच नाही तर चोरांनी स्टोर रुममध्ये असलेले दोन कम्पूटर आणि काही सामान देखील चोरलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
लसीच्या डोससह इतर सामानावरही मारला डल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, कालीखबर रोड येथे ही घटना घडली असून हा परिसर मीरचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत आहे. चोरांनी कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन लसीच्या डोससह इतर सामानावरही डल्ला मारला. परिसरात उभ्या असलेल्या एका रिक्षाचा टायर देखील त्यांनी चोरला आहे. हेल्थ सेंटरमध्ये डोर टू डोर लसीकरण अभियानासाठी या लसी ठेवण्यात आल्या होत्या. पोलीस चोरांचा शोध घेत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.