लोणी काळभोर : कोराना विषाणुचे संसर्ग आजारातून बरा होऊन घरी आलेवर सार्वजनिक ठिकाणी लोक जमा केले. या कृतीने कोरोना हा संसर्गजन्य रोग पसरू शकतो याची जाणीव असतानाही आपले नातेवाईक व मित्र मंडळी असे सुमारे १५ लोक जमा करुन साउंड सिस्टीम लावून नृत्य करून त्याची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल केली. या कृत्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव या अनुषंगाने जारी केलेले आदेशाचा भंग केला म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक गणेश उंबरदेव करचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमेश उर्फ टक्या निवृत्ती राखपसरे ( रा.बेटवस्ती,लोणीकाळभोर, ता.हवेली ) याचेसमवेत त्याचे स्वागत करणाऱ्या पंधराहुन अधिक नातेवाईक व मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे यापुढील काळात विनामास्क रुग्णांचे स्वागत करणाऱ्या नातेवाईकांनाही तुरुगांची हवा खावी लागणार आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उमेश राखपसरे यांना कोरोनाची लागण झाल्याने १० दिवसांपासून हडपसर येथील एका खाजगी रुग्नालयांत त्यांचेवर उपचार चालू होते. उपचार संपल्यानंतर बुधवार ( १ जुलै ) रोजी सायंकाळी ते घऱी परतले. त्यावेळी त्यांच्या मित्र परिवार आणी नातेवाईकांनी त्यांचे स्वागत डिजेच्या तालावर नाचुन केले होते. या स्वागताचा व्हायरल व्हिडीओ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या हाती लागला होता. यात स्वागताच्या वेळी नाचगाणी करतांना सोशल डिस्टन्सींग व मास्कचा वापर केला नसल्याचे आढळुन आल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना बंडगर म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग नागरीकांना घऱाबाहेर पडण्यापुर्वी मास्कचा वापर करण्याबरोबरच, गर्दीत सोशल डिस्टन्सींग पाळा या दोन प्रमुख सुचना केलेल्या आहेत. मात्र राखपसरे हा कोरोनाचे उपचार घेऊन परतल्याचे माहित असतानाही, नागरिकांनी स्वागताच्या वेळी मास्कचा वापर केला नसल्याचे व सोशल डिस्टंन्सिंगचा नियम पायदळी तुडवल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाब गंभीर आहे. गुन्हा दाखल झालेल्या उमेश राखपसरे यांच्यासह त्याच्या पंधराहुन अधिक नातेवाईक व मित्रांना लवकरच अटक करण्यात येणार आहे. यापुढील काळात वरील प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिस अधिक सतर्क राहणार असुन, नागरिकांनी आपआपली काळजी घ्यावे असे आवाहन सुरज बंडगर यांनी केले आहे.