मुंबई : शहर उपनगरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग येत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. तर आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे मुंबईत दिवसभरात २४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ९० हजार ९१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५५९ दिवसांवर पोहोचला आहे.मुंबईत रविवारी ४८३ रुग्ण आणि ८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ८ हजार ९६९ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ३५१ झाला आहे. सध्या ५ हजार ७९७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के असून, २४ ते ३० जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.१२ टक्क्यांवर गेला आहे. शहर उपनगरात आतापर्यंत कोरोनाच्या २८ लाख ४ हजार १८२ चाचण्या झाल्या आहेत. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १९९ असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २ हजार ८६ आहे. राज्यात ४५,०७१ सक्रिय रुग्णमुंबई : राज्यात दिवसभरात १,६७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १९ लाख २९ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१९% झाले आहे. तर सध्या राज्यात ४५ हजार ७१ इतके सक्रिय रुग्ण आहेत.राज्यात २ हजार ५८५ रुग्ण आणि ४० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख २६ हजार ३९९ झाली असून बळींचा ५१ हजार ८२ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ४० मृत्यूंपैकी १५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. आजपर्यंत तपासलेल्या १ कोटी ४६ लाख १७ हजार १६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.८६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९० हजार २३२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २ हजार २९४ व्यक्त संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
coronavirus: मुंबईत २ लाख ९० हजार ९१३ रुग्णांनी केली कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 7:13 AM