CoronaVirus : मध्य प्रदेशातून पलायन केलेल्या 8 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 07:40 PM2020-04-01T19:40:12+5:302020-04-01T19:41:29+5:30
CoronaVirus : कुसुमकोट बु. येथून आठ नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
धारणी (अमरावती) : तालुक्यातील कुसुमकोट बु. गावात मध्य प्रदेशातील खंडवा, बऱ्हाणपूर येथून पळून आलेले विशिष्ट समाजाचे आठ नागरिक त्यांच्या नातेवाइकाकडे थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मंगळवारी साडेनऊ वाजताच्या सुमारास कुसुमकोट बु. गावात जाऊन त्यांना ताब्यात घेतले. यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, तगड्या पोलीस बंदोबस्तामुळे तणाव निवळला. रात्री १ वाजता धारणी येथील मुलींच्या वसतिगृहात त्यांना ठेवण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, कुसुमकोट बु. गावात मध्य प्रदेशातून आलेले नातेवाईक स्थानिक विशिष्ट समाजातील रहिवाशांकडे आल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार धारणी पोलिसांनी मंगळवारी गावात चौकशी केली. आमच्याकडे कोणीच आलेले नसल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शोधमोहीम राबवून या आठ जणांना ताब्यात घेतले आणि त्यांची माहिती लपविणाऱ्या दोन कुटुंबप्रमुखांनाही जेरबंद केले. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे, पोलीस निरीक्षक एल.के. मोहुंदळे, सहायक निरीक्षक अतुल तांबे, उपनिरीक्षक माया वैश्य, कर्मचारी अनिल झरेकर, अनुराग पाल, आकाशे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी तगडा बंदोबस्त ठेवला.
सामान मशिदीमागे लपवून
मध्य प्रदेशातून आलेल्या या नागरिकांचे साहित्य गावातील मशिदमागे लपवून ठेवण्यात आले होते. ते नागरिकांनी हुडकून पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी रात्री १ च्या सुमारास धारणी येथील मुलींच्या निवासी वसतिगृहात आणून ठेवले होते.
दोन दिवसांपासून तळ ठोकून
खंडवा, बऱ्हाणपूर येथून पळून कुसुमकोट येथे दोन दिवसांपासून तळ ठोकणारे सर्व जण वाठोडा शुक्लेश्वर (ता. भातकुली) येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांनी पोलिसांची दिशाभूल केली. अमरावती येथील मुस्लिम बांधवाचा इज्तेमानंतर त्यांना रीतिरिवाजानुसार बाहेरगावच्या मशिदीत पाठविण्यात आले होते. आम्ही सर्वच मशिदीचे नमाजी आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला
सदर मुस्लिम बांधवांना पोलिसांनी मारहाण केल्याची चर्चा कानावर पडताच शहरातील मुस्लिम बांधवांनी वसतिगृहाकडे धाव घेतली. तेथे पोलीस त्यांची चौकशी करत होते. स्थिती लक्षात येताच जामा मशिदीचे अध्यक्ष हाजी फहीम व सलीम खान यांनी त्यांना सत्य लपवू नका व आरोग्य तपासणी करून घ्या, असे सांगितले. शासन निश्चित कालावधीनंतर घरी सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातून कुसुमकोट बु. गावात नागरिक पायी आले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी गावात तनाव निर्माण झाला होता. यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन केले आहे. ज्यांनी आसरा दिला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. - संजय काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी