नवी मुंबई - लॉकडाऊन असतानाही विनाकारण वाहनांमधून भटकणाऱ्या 11484 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये 5270 दुचाकीस्वारांचा समावेश आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 11 ठिकाणी लावलेल्या चेकपोस्टच्या ठिकाणी या कारवाई करण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत लॉकडाऊन च पालन व्हावं यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. त्याकरिता विनाकारण भटकणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. तर संपूर्ण आयुक्तालय कार्यक्षेत्रात 11 ठिकाणी चेकपोस्ट लावून वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये तब्ब्ल 11 हजार 484 वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 5 हजार 270 दुचाकीस्वारांचा समावेश आहे. 20 मार्च पासून ते 6 एप्रिल पर्यंत 11 ठिकाणी या कारवाई झाल्या आहेत. त्यामध्ये वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका, मुकुंद चेक पोस्ट, महापे चेकपोस्ट, कळंबोली, धानसर टोलनाका, शेडुंग टोलनाका, पळस्पे चौक, तळोजा आयजीपीएल नका, कोनफाटा व नावडे फाटा या ठिकाणांचा समावेश आहे. त्याठिकाणी वाहतूक पोलिसांकडून दिवस रात्र गस्त घालून वाहनांची तपासणी करून चौकशी केली जात आहे. लॉकडाऊन लागू असेपर्यंत त्याठिकाणी कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक शाखा उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले.
लॉकडाऊन असतानाही नागरिक ठोस कारणाशिवाय गावाकडे धाव घेत आहेत. अथवा काहीजण विनाकारण वाहनांमधून शहरात फिरत आहेत. त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणाने वाहतूक पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण प्रवास न करण्याचेही आवाहन उपायुक्त लोखंडे यांनी केले आहे.