मुंबई : कोरोना काळात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असताना, दुसरीकडे याचा काळाबाजार तसेच ठग़ीचा धंदाही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशाच ठगांच्या जाळयात अडकलेल्या खारमधील एका कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाचे पैसे वाचविण्यास खार पोलिसांना यश आले आहे.
खार पोलिसांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी कुणाल गोविंद कटारिया यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता असल्याने त्यांनी गुगलवर सर्चिंग सुरु केले. त्यात सिपला फाऊंडेशन नावाने मोबाईल क्रमांक मिळून आला. संबंधित क्रमांकावर संपर्क साधून इंजेक्शनची मागणी केली असता, ठगाने त्यांना ६ इंजेक्शनचे २०, हजार ४०० रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगितले. त्यांनी विश्वास ठेवून पैसे पाठवले. मात्र व्यवहार झाले नसल्याचे सांगून त्यांना पुन्हा पैसे पाठविण्यास सांगितले. त्यांनी पैसे पाठवले. यात त्यांचे एकूण ४० हजार ८०० रूपये खात्यातून गेल्याचे समजले. पैसे देऊनही इंजेक्शन न मिळाल्यामुळे त्यांना संशय आला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप एडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. यात अंमलदार नेत्रा यांनी जराही वेळ न घालवता व्यवहार झालेल्या अकाऊंटची माहिती मिळवून, बँक अकाऊंटच्या नोडल ऑफिसरशी संपर्क साधून सदरचे अकाउंट फ्रिज केले. बँक ऑफ इंडियाच्या पटना शाखेतील बँक खात्यात हे पैसे ट्रान्सफर झाले होते. त्या अकाउंट मध्ये एकूण १३ लाख ३७ हजार ३०५ रुपयांचे व्यवहार झाले. त्यापैकी खात्यात ३ लाख ८० हजार १३८ रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. यात कटारिया यांच्या ४० हजार ८०० रूपयांचे व्यवहार दिसून आले. अशात कटारिया सारख्या अनेक जणांची यात फसवणूक केल्याचेही समोर आले. याबाबत तपास पथक अधिक तपास करत आहे.