जमशेदपूर – चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभर थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाखांच्या वर पोहचला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु असताना जमशेदपूर येथून अजब घटना समोर येत आहे. मंगळवारी रात्री याठिकाणी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याने गोंधळ उडाला.
टीएमएचच्या कोविड वार्डातून हा पॉझिटिव्ह रुग्ण रात्री उशिरा वार्डातून पळून थेट त्याच्या घरी पोहचला. घरी पोहचल्यानंतर त्याने कुटुंबाला माझा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याचं सांगितलं. हे ऐकून कुटुंबाला आनंद झाला. रात्री उशिरापर्यंत कुटुंबाने हा आनंद साजरा केला. फुलांच्या माळेने त्याचे स्वागत केले. त्याचसोबत घराबाहेर फटाके उडवले. पण रात्री २ वाजता जे घडलं ते पाहून कुटुंबाला धक्काच बसला.
जवळपास रात्री २ च्या सुमारास प्रशासनाचं पथक त्याच्या घरी पोहचले आणि कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं. प्रशासनाच्या टीमने कुटुंबाला सांगितले की, या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला नाही, तर तो हॉस्पिटलमधून पळून घरी आला आहे. त्यानंतर पोलिसांनी या रुग्णाला पकडून पुन्हा टीएमएचच्या कोविड वार्डात दाखल केले. बुधवारी पोलिसांनी रुग्णासह कुटुंबातील ११ सदस्यांवर लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात घरातील ४ सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जमशेदपूरच्या पूर्व भागात सिंहभूम जिल्ह्यात कोरोनाचं संक्रमण वेगाने वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १२१ कोरोना रुग्ण आढळले, राज्याच आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांच्या आदेशानंतर जमशेदपूरच्या महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये कोविड रुग्णांसाठी स्पेशल वार्ड सज्ज करण्यात आला आहे. सध्या याठिकाणी १०० बेड्सचं आयसोलेशन वार्ड आहे. याठिकाणी आणखी १०० खाटा वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या फक्त टीएमएच रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार होत आहेत.