मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यातील कारागृहामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यातील 8 करागृह क्वॉरंटाईन करण्यात आले होते. कारागृहातील कर्मचाऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था कारागृहातच करण्यात आली होती. या काळात बाहेरचा व्यक्ती कारागृहात प्रवेश करु शकत नव्हती. तसेच जेलमधील व्यक्ती कोणत्याही कामाने बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये स्वयंपाकीस कोरोनाची लागण झाली असून त्याच्या संपर्कातील ७७ कैद्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. या कैद्यांना बृहमुंबई महानगर पालिकेच्या सहकार्यांने सेंट जॉर्ज रुग्णालयात पुढील उपचारासाठी क्वॉरंटाईन करण्यात आले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. तसेच ७७ कैद्यांसह २६ पोलिसांचे देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
Coronavirus: लॉकडाऊन केलेल्या ऑर्थर रोड कारागृहातील कैद्याला कोरोना; दोन पोलिसांनाही लागण
लॉकडाउन केलेल्या ऑर्थर रोड कारागृहातील एका कैद्याला कोरोनाची लागण झाली आहे, तसेच कारागृहाबाहेर तैनात असलेल्या पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील कारागृहे लॉकडाउन करण्याचा निर्णय ९ तारखेला शासनाने घेतला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृहे लॉकडाउन करण्यास सांगितले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आतील कैद्यांची काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान, कस्तुरबा रुग्णालयापासून काही पावलांवर असलेल्या ऑर्थर रोड कारागृहातील एका कैद्याची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याची ने-आण करणाऱ्या दोन पोलिसांना भायखळा कारागृहाच्या गेस्टहाउसमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याला तेथील अधिकाऱ्यांनी विरोध केला होता.