सोलापूर : मुलगी झाल्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली; परंतु पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने तिचा छळ केला. पत्नीस कोरोना झाल्यानंतर तिला योग्यवेळी औषधोपचार न करून जाणीवपूर्वक तिचा मृत्यू घडवून आणल्याच्या आरोपावरून पतीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी कर्नाटकच्या वैद्यकीय खात्यातील लिंगराज दामू पवार, (रा. तुकाईनगर, मंगळवेढा) याचा अटकपूर्व जामीन अर्ज पंढरपूरच्या अतिरिक्त सत्रन्यायाधीश कमल बोरा यांनी फेटाळून लावला. (Corona Positive wife dies without treatment, murder case against husband)
लिंगराज याचा विवाह २००५ साली उमा शंकर चव्हाण, (रा. सोलापूर) यांची मुलगी अश्विनी हिच्याबरोबर झाला होता. लग्नानंतर अश्विनीला मुलगी झाली. मुलगी झाल्याने नाराज होऊन त्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली. पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पती लिंगराज याने पत्नीचा छळ सुरू केला. तो तिला सतत मारझोड करीत असे. एप्रिल २०२१ मधील पहिल्या आठवड्यात पत्नीस कोरोनाची लागण झाली; परंतु पतीने मुद्दाम तिला उपचारासाठी नेले नाही. उपचारास मुद्दाम उशीर केल्याने तिचा मृत्यू झाला.