कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलं आहे. हॉस्पिटलपासून ते स्मशानभूमीपर्यंत मृतांची लाइन लागली आहे. अशात काही लोक बेजबाबदारपणाने वागत आहेत. मध्य प्रदेशच्या निवाडीमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीच्या गमतीची शिक्षा पूर्ण गावाला भोगावी लागत आहे.
निवाडी जिल्ह्यातील लुहरगुवा गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर स्वत:ला आठ दिवस लवपत राहिला. इतकंच नाही तर गावात झालेल्या एका लग्नात गेला आणि गावातही फिरत राहिला. आता या व्यक्तीमुळे गावातील ३० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील अनेकांची स्थिती गंभीर आहे.
जशी या घटनेची माहिती मिळाली जिल्हा प्रशासनाने गाव सील केलं. आता गावात जाण्यास आणि बाहेर येण्यास मनाई आहे. पोलिसांनी गावाच्या प्रवेशद्वारावर कठडे लावले आहेत. अशातच आता डॉक्टरांची एक टीम गावातील घराघरात जाऊन लोकांच्या टेस्ट करत आहे. पोलिसांनी संक्रमण पसरवणाऱ्या व्यक्तीसहीत गुपचूप लग्न करणाऱ्या तीन लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. (हे पण वाचा : खळबळजनक! आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कर्मचाऱ्यांची रंगली 'नॉनव्हेज'पार्टी)
गावातील एका २४ वर्षीय तरूणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर तो ना क्वारंटाइन झाला ना त्याने याची कुणाला माहिती दिली. तो कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरही गावात बिनधास्त फिरत राहिला. इतकंच नाही तर गावातील लग्नातही गेला आणि नवरी-नवरदेवासोबत त्याने फोटो काढले. तसेच लग्नातील पंगतीत जेवणही वाढत राहिला.
दुसऱ्या दिवशी तो वरातीत सहभागी झाला. इतकंच नाही तर जोरात त्याने डान्सही केला. लग्नातून परतल्यावर तो गावात फिरत राहिला. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली. बुधवारी ६० लोकांच्या टेस्ट केल्या त्यातील ३० जण पॉझिटिव्ह आले.