कर्जत : तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गुडवणवाडीमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. त्यात तेथे असलेल्या बोअरवेलचा हातपंप कोणीतरी तोडला होता. त्याबाबत स्थानिक आदिवासी व्यक्तीने ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मोबाईलमध्ये फोटो काढून माहिती दिली. बोअरवेलची माहिती दिल्याबद्दल १७ लोकांच्या जमावाने पाच तरुणांना मारहाण करण्याची घटना घडली. कर्जत पोलीस ठाण्यात १७ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पाच जखमींवर कशेळे ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गुडवणवाडीमध्ये आदिवासी लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून खाली यावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी खोदलेल्या बोअरवेलला चांगले पाणी असल्याने सध्या पूर्वीसारखी पाणीटंचाई तेथे नाही. असे असताना तेथे असलेल्या बोअरवेलचा हातपंप १२ मे रोजी कोणीतरी तोडला. त्याबद्दल वाडीमधील व्यक्तीने फोटो काढून बोरिवली सरपंच वृषाली क्षीरसागर यांनी कळविले. हातपंप तोडला आणि फोटो कोणी काढले. याची कोणतीही खात्रीलायक माहिती नसताना केवळ संशयावरून अनंता पुंजारा यांच्या घरात घुसून १७ जणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अनंता पुंजारा यांना सोडवण्यासाठी गेलेल्यांना मारहाण करण्यात आली.१२ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता ही घटना गुडवणवाडीमध्ये घडली. मारहाण करणाऱ्या सुरेश खंडवी, वासुदेव खंडवी, दीपक खंडवी, नयन खंडवी, लक्ष्मण खंडवी, अनंता खंडवी, कमलाकर खंडवी, जगदीश पारधी, नरेश खंडवी, किरण खंडवी, मोहन पारधी, धनेश पारधी, मंगल निर्गुडा, विजय निर्गुडा, हरिष खंडवी आणि सखाराम पारधी अशा १७ जणांवर गुन्हा दाखल के ला आहे.
coronavirus: गुडवणवाडीमध्ये पाण्याच्या बोअरिंगवरून हाणामारी; पाच जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:57 AM