नवी दिल्ली - एकीकडे कोरोनामुळे लोक त्रस्त आहेत, तर दुसरीकडे काळाबाजार आन् फसवाफसवी सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी आज अशाच दोन जणांना अटक केली. हे दोघे कोरोनाच्या या कठीण काळात ऑक्सिजन सिलेंडरच्या नावावर फायर एक्सटिंग्विशर विकून फसवाफसवी करत होते.
आधी दिल्ली पोलिसांनीऑक्सिजन सिलेंडर आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या काहींना अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी अटक केलेले हे दोन आरोपी माणुसकीच्या नावावर कलंक आहेत.
बिंदापूर येथील गीता अरोडा यांनी उत्तम नगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती, की त्यांना आपल्या रुग्णासाठी ऑक्सीजन सिलेंडरची आवश्यकता होती. बऱ्याच प्रयत्नांनंतरही त्यांना कुठल्याही रुग्णालयात जागा मिळाली नाही. तेव्हा ऑक्सिजन सिलेंडरचा शोध घेत असताना त्यांची ओळख आशुतोष नावाच्या एका व्यक्तीशी झाली. आशुतोष सोबत त्याचा एक सहकारी आयुष देखील होता.
Corona Vaccine: ही लक्षणं सांगतात, तुमच्या शरीरात काम करतेय कोरोना लस! पण, लक्षणं नसतील तर...?
या दोघांनी गीता अरोडा यांना ऑक्सिजन सिलेंडरच्या नावाने फायर एक्सटिंग्विशर विकले. गीता अरोडा यांना हे समजल्यानंतर, त्यांनी या दोघांना बरेच फोन केले. मात्र, त्यांचा फोन बंद झाला होता. यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली.
यानंतर द्वारका जिल्ह्यातील पोलिसांनी यासंदर्भात एफआयआर नोंदवून चौकशीला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी आशुतोष आणि आयुष यांचे मोबाईल नंबर सर्व्हिलांसवर लावून त्यांचे लोकेशेन मिळवले आणि त्यांना अटक केली. आशुतोष आणि आयुष दोघेही विकासपुरी येथील आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 फायर एक्सटिंग्विशर जप्त केले आहेत.
देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे रुग्ण -देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 2,69,507 बरे झाले आहेत. काल देशात 3,60,960 कोरोनाबाधित सापडले होते. आज यात जवळपास 18 हजारांनी वाढ झाली आहे. तर मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाने 3645 जणांचा बळी घेतला आहे. काल मृतांचा आकडा 3293 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 350 मृतांची वाढ झाली आहे. आता, देशात एकूण मृतांचा आकडा 2,04,832 झाला असून सध्या 30,84,814 रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर एकूण 1,83,76,524 रुग्ण सापडले असून यापैकी 1,50,86,878 रुग्ण बरे झाले आहेत. लसीकरणाचा आकडा 15,00,20,648 वर गेला आहे.