मेरठ - जगभरात कोरोना विषाणूचा हाहाकार वाढत आहे. त्याचवेळी, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाउन देखील लागू करण्यात आला आहे. दरम्यान, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, परंतु तरीही लोक लॉकडाऊनला हरताळ फासत आहेत. याशिवाय लॉकडाऊनदरम्यान समाजात अशी अनेक प्रकरणे पाहायला मिळतात ज्यात काही नवीन संबंध जोडले जात आहेत आणि काही लोकांचे संबंध बिघडताना दिसत आहेत. अशीच एक घटना मेरठमध्ये समोर आली आहे. जेथे एका पतीने आरोप केला आहे की, आपली पत्नी लॉकडाउनचे नियम पालन करीत नाही. त्यानंतर पती पत्नीची तक्रार घेऊन पोलिसांकडे पोहोचला. पत्नीवर नाराज झाल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती मिळत आहे.हे प्रकरण मेरठच्या पोलिस स्टेशनच्या लिसाडी गेट परिसराच्या खुशी नगरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. जेथे अमजद नावाच्या व्यक्तीने लिसाडी गेट पोलिस ठाण्यात जाऊन पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दिली. लेखी तक्रार पत्रात पतीने पत्नीचे नाव फरिदा असे म्हटले आहे. ती लॉकडाउनचे नियमांचे पालन करीत नाही. त्यामुळे त्याला त्रास झाला आहे. नवऱ्याने सांगितले की, त्याने पत्नीविषयी सासरच्यांनाही तक्रार केली आहे. नवरा म्हणतो की, घरात सर्व आवश्यक वस्तू आहेत, तरीही बायको लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत नाही.
नवऱ्याने केलेल्या तक्रारीकडे तिच्या सासरच्यांनीही दुर्लक्ष केले असा आरोप अमजदने केला आहे. त्यानंतर तो अस्वस्थ झाला आणि मेरठच्या लिसाडी गेट पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पत्नीवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी पतीची मागणी आहे. स्वत: अमजद मोटरसायकलवरून कोरोनाविरूद्ध जनजागृती मोहीम राबवित आहे. मात्र, पोलिस स्टेशनचे पोलिस सांगतात की, आतापर्यंत तपासात काहीच समोर आले नाही. या प्रकरणात मेरठचे एसपी सिटी अखिलेश नारायण म्हणतात, 'दोन दिवसांपूर्वी ही तक्रार करण्यात आली होती. लोकांना समजावले जात आहे. जे लोक ऐकत नाही अशा लोकांवर कारवाई केली जाईल. त्याचवेळी पतीच्या तक्रारीवरून हे प्रसिद्धीसाठी केले गेलेले कृत्य नाही ना याचा पोलीस तपास करत आहेत.