नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. याच दरम्यान अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसेच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे.
एका रुग्णालयात नर्स उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना भलतंच नॉर्मल इंजेक्शन देऊन रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करत असल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर ती आपल्या प्रियकराला याचा पुरवठा करुन हे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकत होती. मध्य प्रदेशमध्ये ही घटना आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, प्रेमासाठी रुग्णांच्या जीवाशी असा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी भोपाळ पोलिसांनी जेव्हा एका तरुणाला ताब्यात घेतलं तेव्हा हे सत्य समोर आलं आहे.
आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, झलकन सिंह असं त्याचं नाव असून त्याची प्रेयसी शालिनी जे के रुग्णालयात नर्सिंह स्टाफ आहे. आरोपी नर्स सध्या फरार आहे. शालिनी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. मात्र ती रुग्णांना रेमडेसिवीरच्या जागी दुसरं नॉर्मल इंजेक्शन देत होती. रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याजवळच ठेवत होती. हे इंजेक्शन तो 20 ते 30 हजारात ब्लॅकमध्ये नंतर विकलं जात असे. आरोपीने जे के रुग्णालयातीलच डॉक्टरला हे इंजेक्शन तब्बल 13 हजार रुपयांत विकलं होतं. याचं पेमेंट त्याला ऑनलाईन दिलं गेलं असल्याची माहिती दिली.
भोपाळच्या जेके रुग्णालयाबाहेर एक जण रेमडेसिवीर इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकतो याची पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी नीट प्लॅनिंग करून त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यावेळी त्याच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शन सापडलं. पोलिसांनी यासंबंधित कागदपत्र मागितली असता त्याने नकार दिला. त्यानंतर कसून चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर नर्स फरार असून तिचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अरे देवा! कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी चक्क रुग्णालयातून चोरले ऑक्सिजन सिलिंडर; घटनेने खळबळ
कोरोनामुळ अनेक राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांच्या नातेवाईकांवर चक्क आता ऑक्सिजन सिलिंडर चोरण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये ही घटना घडली आहे. नातेवाईक ऑक्सिजन सिलिंडर चोरून घेऊन जात असल्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ऑक्सिजन सिलिंडरने भरलेली एक गाडी रुग्णालयाजवळ आली होती. त्याचवेळी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी एक-एक करून सिलिंडर चोरून नेला.