जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 18 कोटींवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,04,58,251 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,617 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 853 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,00,312 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे.
कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पतीने आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे पतीने आपल्या दोन मुलींची गळा घोटून हत्या केली आणि नंतर टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलींना मारल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागराज असं या व्यक्तीचं नाव असून गेल्या आठवड्यात त्याची पत्नी शर्मिलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
पत्नीच्या मृत्यूने नागराजला खूप मोठा धक्का बसला होता. तसेच घरातील सदस्य देखील मृत्यूचा धक्का सहन करू शकत नव्हते. पत्नीच्या अचानक जाण्याने नागराज निराश झाला होता. त्याने आपली मुलगी किर्ती (12) आणि मोनिषा (10) या दोघींची राहत्या घरामध्ये गळा घोटून हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. सकाळी दूधविक्रेता आल्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करण्यात येत आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कॉन्स्टेबलची आत्महत्या; स्वत:वर गोळी झाडून संपवलं जीवन
देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक भयंकर घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे भोपाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकातील कर्मचाऱ्याने अशी अचानकपणे हत्या केल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येमागचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे. अजय सिंह असं आत्महत्या केलेल्या कॉन्स्टेबलचं नाव आहे.