मुंबई - देशभरात लॉकडाऊन असून कर्फ्यू काळात शहरातून मास्कचा काळाबाजार उघड़कीस आणल्यानंतर सॅनिटायझरचा अवैध साठा जप्त करण्यास गुन्हे शाखेने सुरुवात केली आहे. ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा चढ्या भावाने सॅनिटायझरची विक्री करण्यासाठी माहिम येथील घरातच सॅनिटायझर साठा करणाऱ्या त्रिकुटाला गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने बेडया ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अडीच लाख किंमतीचा सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला आहे.
विराज गौरंग धारिया (२०), जैनम हरेश देधिया (२१) आणि नीरज रंजनीकांत व्यास (४९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, ही मंडळी शासनाने ठरवून दिलेल्या रककमेपेक्षा जास्त किंमतीने सॅनिटायझरची विक्री करण्यासाठी त्याचा साठा करून ठेवत होते. याबाबत माहिती मिळताच माहिम येथील दिनाथवाड़ी येथील एका फ्लैट मध्ये छापा टाकला. तेथे दोन तरुण मिळून आले. घरझडतीत सॅनिटायझरच्या १०० मिलीच्या ५ हजार बाटल्यांचा साठा मिळून आला. याबाबत त्यांच्याकडे कुठलाही परवाना मिळून आला नाही. ही मंडळी ते ५० रूपयांची बॉटल ६५ रूपयांत विकणाऱ होते.
त्यांच्या चौकशीतून मुख्य आरोपीची माहिती मिळताच त्यालाही मीरारोड येथून अटक करण्यात आली. हा साठा हिंदुस्थान लेब्रोटरी या कंपनीकडून जुहू येथील क्यूअरवेल मेडिकल अंड जनरल स्टोरच्या नावाने वितरित झाला होता. हा साठा आरोपींकड़े कसा आला याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.