डेल नॉर्टे - जगात कोरोनाने थैमान घातले असून त्याला आळा घालण्यासाठी भारतासह अनेक देशांत लॉकडाऊन घोषित केलेले असूनही विनाकारन रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून नाना परीने समजावून सांगितले जात आहे. फिलिपिन्समध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या एका 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे.
लॉकडाऊनचे नियम मोडून एक ज्येष्ठ नागरिक मद्यधुंद अवस्थेत हातात विळा घेऊन रस्त्यावर फिरत होता. अनावश्यक फिरत असताना पोलिसांनी या व्यक्तीला चेकपॉईंटवर रोखले. त्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांनाच उलट धमकावले. एवढ्यावरच न थांबता या व्यक्तीने पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला देखील केला.पोलिसांनी आपला जीव बचावण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. अगुसानच्या डेल नॉर्टे प्रांतातील नासीपिट शहरात एका चेकपॉईंटवर या ज्येष्ठ नागरिकाला रोखले असता तो शिवीगाळ करु लागला. मास्क न घातल्याने तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला विचारणा केली. त्यावेळी त्याने रागाच्या भरात कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यामुळे प्रतिकार म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला.
करोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या फिलिपिन्सने देशात लॉकडाऊन केला आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कठोर अंमलबजावणीस सुरुवात करण्याचे आदेश दिले आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घाला, असा आदेश फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो डुटेर्ट यांनी सैन्य आणि पोलिसांना दिला आहे.