मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहार गाव येथून १४ कोटींचा मास्कचा साठा जप्त केला असताना येथीलच शहा वेअर हाऊसिंग व ट्रान्सपोर्ट गोडाऊनमधून तब्बल १ कोटी किंमतीचा ४ लाख मास्कचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणात ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
सहार कार्गो येथील काही गोडाऊनमध्ये मास्कचा साठा करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिव भोसले आणि गुन्हे अन्वेषण विभागाने या ठिकाणी छापा टाकला. येथील ३ गोडाऊन मध्ये असलेल्या तब्बल २०० बॉक्स मधून ४ लाख मास्कचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गोडाऊन मालक प्रफुल्ल शहासह नितीन जयसिंग, आणि उत्पादक कंपनीविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहेत.
अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार थांबवा...अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार केल्यास कोठड़ीची हवा खावी लागेल. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत काळा बाजार करू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी केले आहे.गोडाऊन मालक रडारवर...मास्कचा काळा बाजार उघड़कीस आल्यानंतर मुंबईपोलिसांकडून गोडाऊनची झाडाझडती घेण्यास सुरुवात झाली आहे. महत्त्वाच्या ठिकाणावरील गोडाऊनची तपासणी करत आणखीन कुठे अशा प्रकारे काळा बाजार होतोय का? याची पाहणी सुरु आहे.