Coronavirus: मास्क न घातल्यानं MP पोलिसांनी भररस्त्यात रिक्षा चालकाला बेदम मारलं; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 09:28 AM2021-04-07T09:28:20+5:302021-04-07T09:31:08+5:30
मारहाणीच्या वेळी रिक्षाचालकाचा ११ वर्षाचा मुलगाही व्हिडीओत दिसत आहे. वडिलांना सोडावं असं हा मुलगा पोलिसांना विनवणी करत आहे. तरीही पोलीस या रिक्षाचालकाला मारहाण करत होते.
इंदौर – मध्य प्रदेशात कोरोना महामारीनं मोठ्या प्रमाणात डोकं वर काढलं आहे. या महामारीत सर्वाधिक फटका इंदौर आणि भोपाळ या दोन्ही शहरांना बसला आहे. अशातच या दोन्ही शहरात मास्क न घालणाऱ्या लोकांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत. यात मंगळवारी इंदौर पोलिसांनी एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत दोन पोलीस कर्मचारी एका रिक्षा चालकाला भररस्त्यात बेदम चोप देताना दिसत आहेत. सोशल मीडियात हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस अधिकाऱ्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी मास्क न घातल्यामुळे मारहाण केली नाही असा दावा करत आहे. मारहाणीच्या वेळी रिक्षाचालकाचा ११ वर्षाचा मुलगाही व्हिडीओत दिसत आहे. वडिलांना सोडावं असं हा मुलगा पोलिसांना विनवणी करत आहे. तरीही पोलीस या रिक्षाचालकाला मारहाण करत होते.
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या कृत्याचा निषेध केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षकांनी त्याची गंभीर दखल घेत या कर्मचाऱ्यांचं निलंबन केले आहे. हा प्रकार परदेशीपूरा परिसरातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी महेश प्रजापती आणि गोपाळ जाट यांनी रिक्षाचालक कृष्णा कुंजीर यांना मास्क न घातल्यामुळे रोखलं. यावेळी रिक्षाचालक आणि पोलीस कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून रिक्षाचालकाला चोप दिला. घटनास्थळी असणाऱ्या काही लोकांनी याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हापासून इंदौर पोलिसांच्या कृत्याचा निषेध केला जात आहे.
तर पोलिसांचे म्हणणं आहे की, रिक्षाचालक कृष्णाच्या विरोधात दोन गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत आणि तो नशाही करतो. पोलीस कृष्णाचा शोध घेण्यासाठी त्याच्या घरी गेली. तेव्हा घरच्या लोकांनीही पोलिसांना अश्लिल भाषेचा वापर केला. त्यानंतर कृष्णा जेव्हा सापडला तेव्हा त्याला पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कृष्णाने शिवीगाळ केली. वाद वाढल्यानंतर हा प्रकार घडला. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.