मुंबई - दिल्ली येथील मरकजमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमला उपस्थित राहून देखील माहिती लपवल्याच्या आरोपाखाली 150 व्यक्तींविरोधात मुंबईपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. दं. वि. कलम 188, 269 व 270 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमात मरकजला सभागी झालेल्या 150 व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ त्यांचा शोध घेऊन त्यातील अनेकांना वेगळे (क्वारंटाईन) करण्यात आले. मात्र, देशात आणि राज्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी सामूहिक कार्यक्रम करण्यास मनाई असतानाही मुंबईतील 150 व्यक्ती या तबलिगीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच त्याची माहिती लपवल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी या 150 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आमीर अनिस रेहमान खान, फैयाज शिरगावकर, अली हुसेन रहिमतुत्ताशेख, मो. नाहिद अहमद शेख, इस्माईल इब्राहिम सिद्दीकी, अब्दुल अजिज खान, मोहम्मद हमजा, सरफराज मोदी, मोहम्मद अल्ताफ खान, सोहेल मोहम्मद मुक्तार पटेल यांच्यासह 150 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्यावतीने अग्निशमन दलाचे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार साथीचा रोग पसरवण्यास मदत केल्याप्रकरणी आणि कार्याक्रमाला उपस्थित राहूनही माहिती लपवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कोरोनाची साथ पसरेल असे कृत्य केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी 150 तबलिगीशी संबंधीत व्यक्तींचे विलीगीकरण (?क्वारंटाईन) करण्यात आले आहे. त्यातील सांताक्रूज येथील बडी मस्जिद 20 लोकांना तर वांद्रे येथील झरिना सोसायटी येथे 12 लोकांना विलीगीकरण करण्यात आले. वांद्रे येथील 12 लोक इंडोनेशियामधून आले होते. तसेच बडी मस्जिदमधील लोकं गुजरात,राजस्थानचे होते. 30 मार्चला यांची डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांना क्वारंटाईन केलं. मात्र, पुन्हा तपासण्या करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय इतर व्यक्तींची माहिती घेण्याचे कामही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून यांना 14 दिवस क्वारंटाईन केलं आहे.