मेरठ – उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात कोरोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आतापर्यंत १ हजार ११६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचं संकट असतानाही याठिकाणी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात २५०० रुपयात लोकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सोपवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागं झालं आहे. सीएमओ डॉ. राजकुमार यांनी प्राथमिक चौकशीत या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नर्सिंग होमचे मालक आणि संचालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबत रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रियाही सुरु केली आहे. लिसाडी गेट परिसरातील न्यू मेरठ नर्सिग होममधील हा प्रकार आहे. व्हायरल व्हिडीओनुसार नर्सिंग होममध्ये एक व्यक्ती कोरोनाबाबत रुग्णालयातील डॉक्टरशी संवाद साधत होता. ज्यात रिपोर्ट तयार होईल, एका आठवड्यात मान्यताही मिळेल असा संवाद आहे.
व्हिडीओमध्ये सांगितलं जात आहे की, रिपोर्टवर जिल्हा प्रशासनाचा शिक्का असेल. २ मिनिटे ३३ सेकंदच्या या व्हिडीओत या व्यक्तीला डॉक्टर सांगतात की, जिल्हा रुग्णालयाचा अहवाल मिळेल, १ आठवड्यात त्यास मान्यता मिळेल. ते घेऊन कुठेही जाऊ शकता. चाचणी केली तर पॉझिटिव्ह येण्याचीही शक्यता असते, जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर १४ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागेल. पण २५०० रुपये दिले तर रिपोर्ट निगेटिव्ह येईल. या नर्सिंग होमवर बेकायदेशीरपणे कोरोना रिपोर्ट देण्याचा आरोप आहे. व्हायरल व्हिडीओनंतर आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
लिसाडी गेटमध्ये आरोग्य विभागाने आरोपी नर्सिंग होम संचालक शाह आलम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीएमओ डॉ. राजकुमार यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यात येणार आहे. या रॅकेटमध्ये कोण-कोण सहभागी आहे याचा तपास होईल. रिपोर्ट कुठून बनवला जात आहे? सरकारी रुग्णालयाचा शिक्का कसा लावणार? हे सर्व तपासाअंती समोर येईल. तर जिल्हाधिकारी अनिल ढिंगारा यांनी न्यू मेरळ रुग्णालयाला तात्काळ सील करण्याचे आदेश दिले आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...अन्यथा होणार कारवाई; लॉकडाऊनचं कठोर पालन करण्यासाठी सरकारचे '७ कलमी' आदेश
कोरोनापाठोपाठ आणखी एका विषाणूचा मानवाला धोका; चीनने केला अलर्ट जारी
Exclusive: १७ रुपयांच्या मास्कची खरेदी २०० रुपयांना; आरोग्य विभागाकडून वारेमाप लूट
हवेच्या माध्यमातून पसरतोय कोरोना?; २३९ वैज्ञानिकांचा मोठा दावा, WHO ला पाठवलं पत्र
…तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय?; शिवसेनेचा भाजपा सरकारवर हल्लाबोल