नवी दिल्ली - जगातील सर्वच देश कोरोनाशी सामना करत असून व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. कोरोनामुळे हसतं-खेळतं घरं उद्ध्वस्त झालं आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. काहींनी कोरोनाचा धसका घेतला आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे. आई-वडिलांनी चिमुकल्यांसह जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नुल शहरातील वड्डगेरी भागात एक कुटुंब राहत होतं. कोरोनाच्या भीतीने चार जणांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे, सुसाईड नोटमध्ये त्यांनी याबाबत उल्लेख केला होता. प्रताप (42), हेमलता (36), जयंत (17) आणि रिशिता (14) अशी आत्महत्या केलेल्यांची नावं आहेत. यामध्ये प्रताप हे टीव्ही मेकॅनिक होते. तर जयंत एक कोर्स करत होता आणि रिशिता इयत्ता सातवीमध्ये शिकत होती.
बुधवारी सकाळी घरातील कोणताही सदस्य बाहेर दिसलं नाही. तसेच घराचा दरवाजा देखील उघडला नाही. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या मंडळींना थोडासा संशय आला. त्यांनी दार वाजवल्यानंतरही आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी तिथे त्यांना चौघांचे मृतदेह आढळले. तसेच घटनास्थळावरुन पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली आहे. यामध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण कोरोनाची भीती असल्याचे म्हटलं आहे.
सुसाईड नोटमधून झाला धक्कादायक खुलासा
कुटुंबाने सुसाईड नोटमध्ये त्यांच्या मित्राचा आणि नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची भीती सतावत होती असं म्हटलं आहे. याच भीतीमधून या संपूर्ण कुटुंबाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे 18, 54457 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 53,880 ही सक्रिय रुग्णांची संख्या आहे. तर राज्यात 12,416 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.