पणजी: गोव्यात पहिल्यांदाच पर्यटन हंगाम संपण्यापूर्वी अमली पदार्थांचा व्यापार थंडावला आहे. कोरोना संकटामुळे गोव्यात पर्यटकांचा शुकशुकाट झाल्यामुळे अमली पदार्थ वाल्यांचे व्यवहार थंडावले आहेत.
कोरोना संसर्गामुळे चांगले उद्योग धंदे व व्यावसाय अडचणीत आले आहेत असे नसून तस्करी आणि गुन्हेगारी जगतातही मंदी असल्याचे संकेत मिळत आहेत. २२ मार्च नंतर राज्यात अमली पदार्थाचे व्यवहार आढळले नसल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी विभागाचे निरीक्षक सुदेश गावडे यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर २२ मार्चपासून लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. काही निर्बंध उठविण्याचे अपवाद वगळल्यास ते अजूनपर्यंत चालू आहे. लॉकडाऊन नंतर गोव्यात आलेल्या ६ हजार विदेशी नागरिकांची त्यांच्या देशात रवानगी करण्यात आली होती. तसेच विदेशातून येणाऱ्या विमानातही बंदी घालण्यात आली होती. अमली पदार्थाचे व्यवहार हे जास्तीत जास्त विदेशी नागरीक असलेल्या ठिकाणीच होत असतात. गांजा वगळता इतर अमली पदार्थाचे बहुतेक अंमली पदार्थाचे ग्राहक हे विदेशी नागरीकच असतात. एवढेच नव्हे तर हे पदार्थ विकणाऱ्यांतही विदेशींचाच अधिक समावेश असतो. त्यामुळे लॉकडाऊन मुळे पर्यटक नाहीत आणि पर्यटक नसल्यामुळे अंमली पदार्थांचा व्यवहार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एरव्ही पर्यटन हंगाम संपल्यानंतरही अमली पदार्थाचे व्यवहार कमी प्रमाणात तरी होत असतात असे या पूर्वीच्या नोंदी सांगतात.