लॉकडाऊनदरम्यान घराबाहेर पडताना मास्क घातले नाही म्हणून ७८ वर्षीय वडिलांनी आपल्या पोटच्या ४५ वर्षीय दिव्यांग मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोलकातामध्ये शनिवारी सायंकाळी घडला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
कोरोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनचा दुसरा टप्पा जारी करण्यात आला असताना अशा गंभीर परिस्थितीत या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलाची हत्या केल्यानंतर वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी वंशीधर मलिक श्यामपुकुर पोलीस ठाण्यात आला आणि त्यांनी श्रीशेंदू मलिक या आपल्या मुलाची सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हत्या केल्याचे सांगितले. मुलगा दिव्यांग होता. आरोपीने कपड्याच्या सहाय्याने मुलाची गळा आवळून हत्या केली होती. ही घटना समजताच घटनास्थळी स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी झाले आणि कोलकाता पोलिसांनी देखील पथकानेही या हत्येबद्दल माहिती घेतली.
आरोपी वडील एका खासगी कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्याचा मुलगा बेरोजगार होता. तो लहानपणापासूनच दिव्यांग होता. वडील-मुलाची सारखी भांडणं होत असत. मिळालेल्या माहितीनुसार, वडील आणि मुलाचे मास्क घालण्यावरून भांडण झाले. आरोपीचा मुलगा लॉकडाऊनमध्ये घराबाहेर जात होता. यावर, त्याच्या वडिलांनी त्याला जबरदस्तीने मास्क घालण्यास सांगितले. दिव्यांग मुलाचा राग अनावर झाला. नंतर या प्रकरणात वडील आणि मुलगा यांच्यात भांडण वाढले आणि हत्या घडली. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.