Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 08:23 PM2020-05-09T20:23:33+5:302020-05-09T20:25:24+5:30
Coronavirus : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा वाढत चाललेल्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. आतापर्यंत ७७ कैदी आणि २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या
ताण कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम, ऑन ड्युटी पोलिसाचा केला बर्थडे साजरा
आर्थर रोड कारागृहातील एक कैदी अली अकबर श्रॉफ याने वैद्यकीय कारणास्तव तात्पुरती जामिनावर सुटका करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या.भारती डांगरे यांच्यापुढे सुनावणी होती. परिस्थिती अनिश्चित आहे आणि अशा परिस्थितीत राज्य सरकारने व धोरण आखणाऱ्यांनी यावर निर्णय घ्यावा, असे न्या. डांगरे यांनी म्हटले.
आर्थर रोड कारागृहात १०० पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब सत्य असेल तर ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली नाही, त्यांना कारागृहातील गर्दीमुळे कोरोना झाली, अशी सबब सरकारने किंवा कारागृह प्रशासनाने देऊ नये, असेही न्या. डांगरे यांनी म्हटले. कैद्यांनाही सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळविण्याचा अधिकार आहे, हे प्रशासनाने लक्षात ठेवावे, असे म्हणत न्या. डांगरे यांनी राज्य सरकार व प्रशासनाने योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
'अशा स्थितीत कारागृह प्रशासन संवेदनशीलपणे वागेल, अशी आशा आणि अपेक्षा आहे,' असे न्यायालयाने म्हटले. अनेक कैदी ६० वर्षांपेक्षा अधिक आहेत आणि ते वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत. या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार व कारागृह प्रशासन योग्य तो धोरणात्मक निर्णय घेऊ शकते,' असे न्यायालयाने म्हटले. श्रॉफ यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी श्रॉफ याला हायपर टेन्शन, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्याची जामिनावर सुटका करावी, अशी विनंती पौडा यांनी न्यायालयाला केली. मात्र, यापैकी एकही लक्षण कैद्यामध्ये नाही, असे म्हणत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.