मनीषा म्हात्रे
मुंबई : अचानक पोलीस बाबाची तब्येत बिघडली. अंग तापाने फणफणु लागले आणि सुरु झाली पोलीस बाबाना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची धडपड. कोरोना संशयित असलेल्या या पोलिसाला राजावाड़ी ते कस्तुरबा.. कस्तुरबा ते नायर.. नायर ते केईएम करत अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे केईएम रुग्णालयात उपचार मिळाले खरे, मात्र सोमवारी उपचारादरम्यान या शिपायाची मृत्यूशी झुंज अखेर संपली.
कुर्ला वाहतूक विभागात संबंधित पोलीस हवालदार कार्यरत आहेत. २० तारखेला घरात असताना ताप वाढल्याने त्यांनी खाजगी डॉक्टरांकडून उपचार घेतले. मंगळवारीही ताप कमी न झाल्याने मुलाने त्यांना दुपारच्या सुमारास राजावाड़ी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा हॉस्पिटल येथे जाण्यास सांगताच मुलाने कस्तुरबा रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याचे सांगत त्यांना नायर रुग्णालयाचा मार्ग दाखवला. मुुलाने विनंती करूनही त्यांना दाखल करून घेतले नाही. अखेर मुलाने नायर रुग्णालयाकडे धाव घेतली. नायर रुग्णालयानेही तेच कारण देत केईएमकड़े जाण्यास सांगितले.
मुलाने आशेने रात्री ९ च्या सुमारास केईएम रुग्णालय गाठले. मात्र तेथील डॉक्टरांनीही नकार देत कस्तुरबाचा रस्ता दाखवला. याबाबत मुलाने कुर्ला वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रणदिवेकड़े व्यथा मांडली. ते देखील नियंत्रण कक्षाद्वारे याबाबत मदत मागत होते. अखेर भोईवाड़ा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद कांबळेना कॉल करून याबाबत कारवाइ करण्यास सांगितले. कांबळेनी हस्तक्षेप करत रुग्णालयातील अधिकारीना त्यांना दाखल करून घेण्यास सांगितले. आणि तब्बल तासाभराने १० च्या सुमारास त्यांच्यावर उपचार सुरु झाले. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने त्यांच्या मुलासह त्यांच्या उपचारासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत मुंबईपोलिसांनी ट्वी द्वारे माहिती दिली.