मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव संबंध जगभरात पसरत असून मुंबई देखील कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या कोरोनाच्या लढाईत समर्थपणे लढणाऱ्या आणि रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी ३५ पोलीस ठाण्यांबाहेर सॅनिटायझेशन टनेल उभारण्यात आले आहेत. सध्या धारावी, गोवंडी, शिवाजीनगर, दादर या चार ठिकाणी टनेल उभारण्यात आले होते. त्यानंतर आता 35 ठिकाणी असे टनेल उभारण्यात आले आहे.
यापुढे गरज भासल्यास हा आकडा वाढवण्यात येणार असून त्यासाठी एनजीओंची मदती घेतली जाणार आहे. या ठिकाणी कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेले पीपीटी किट घालून एक पोलीस कर्मचारी या तंबुत ये - जा करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच नाकाबंदीत ताब्यात घेतलेल्या संशयितांवर सॅनिटायझेशनचा फवारा करतात. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल. पालिसांनी शहरांत हॉटस्पॉट असलेली कोरोनाबाधीत ठिकाणे तसेच गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझेशन तंबुची उभारणी करण्यात आली आहे.
या सॅनिटायझेशन टनेलमुळे धारावीतील पोलिसांना आणि अनेक नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे गोंवडी, शिवाजीनगर आणि दादर परिसरात देखील अशा प्रकारचे सॅनिटायझेशन तंबू उभारण्यात आले होते. त्याचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ३५ ठिकाणी असे टनेल उभारण्यात आले आहेत. गस्त घालून आलेले पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी या सॅनिटायझेन टनेलमध्ये जातील. यातून होणाऱ्या फवारणीच्या मदतीने पोलीस स्वतःला सॅनिटाइज करू शकतील. दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांना प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी धारावी पोलीस ठाण्यात सॅनिटायझेशन टनेल उभारण्यात आला आहे. अशा प्रकारचे तंबू अनेक ठिकाणी उभारण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.