सचिन सागरे
कल्याण : शासकीय मनाई आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळ पोलिसांनी तब्बल 206 गाड्या जप्त केल्या आहेत. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी ही माहिती दिली.22 मार्च ते 31 मार्च दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचा हा आकडा असून कालच्या एका दिवसातच (31 मार्च 2020) 96 गाड्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विनाकारण गाड्या घेऊन बाहेर न पडण्याचे आदेश आणि आवाहन वारंवार करूनही अनेकांना त्याचे उल्लंघन करण्यात मजा वाटत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही आता कडक ऍक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. ‘विनाकारण घराबाहेर पडाल तर गुन्हेही दाखल होतील आणि गाड्याही जप्त होतील’ या आवाहनानूसार पोलिसांनी आपला ‘पोलीसी खाक्या’ दाखवायला सुरवात केल्याचे कराळे यांनी सांगितले.गेल्या दहा दिवसांत (22 ते 31 मार्च) 209 गाड्या जप्त करण्यात आल्या असून 333 गाड्यांच्या चाव्या पोलिसांनी संबंधित व्यक्तींकडून स्वतःच्या ताब्यात घेतल्या आहेत. तर वेगवेगळ्या कलमांखाली आतापर्यंत 216 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तर आजपासून विनाकारण बाहेर पडणाऱ्या व्यक्ती आणि गाड्यांवरील ही कारवाई अधिक कडकपणे अंमलात आणणार असल्याचेही कराळे यांनी सांगितले.