नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,132 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 193 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,50,782 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसती-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.
कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याने एक दोन वर्षांची चिमुकली अनाथ झाली आहे. मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र पत्नीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृतदेहासोबत चिमुकलीने रडत रडत रात्र काढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी या व्यक्तीच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 2 वर्षांची चिमुकली अनाथ
पत्नीच्या अचानक जाण्याने तरुण खूप निराश झाला होता. प्रदीप अहिरवार असं या व्यक्तीचं नाव असून तो एक शेतकरी होता. पत्नीच्या मृत्यूनंतर तो आपल्या दोन वर्षांच्या मुलीसोबत राहत होता. पत्नीच्या जाण्याने त्याला मोठा धक्का बसला होता. त्यामुळेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. प्रदीपचा भाऊ काही कामानिमित्त प्रदीपच्या घरी आला होता. त्याने दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला पण कोणीच दरवाजा उघडला नाही. याच वेळी आतमध्ये मुलगी रडत असल्याचं समजलं.
दोन वर्षांची मुलगी आतमध्ये खूप रडत होती
भावाने खिडकीतून पाहिलं असता प्रदीप गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर दोन वर्षांची मुलगी आतमध्ये खूप रडत होती. यानंतर नातेवाईक आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.